महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या मदतीस कार्यरत असलेले एकमेव माहितीपूर्ण संकेतस्थळ
काय आहे भेंडवळ घटमांडणी आणि येणाऱ्या वर्षाचे भाकीत कसे ठरते, जाणून घ्या!

भेंडवळ घटमांडणी ही गेल्या 371 वर्षांपासून भेंडवळ गावातील शेतात केली जात आहे. सदर परंपरा तपस्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी 1650 वर्षाच्या नक्षत्र अभ्यासावरून सुरू केली होती जी आता त्यांच्या वंशजांनी म्हणजेच पुंजाजी महाराज वाघ आणि सारंगधर महाराज वाघ यांनी देखील कायम ठेवलेली आहे. ही मांडणी मुख्यतः गुढी पाडवा ते अक्षय्य तृतीयेच्या दरम्यान केली जाते. भेंडवळ हे गाव जळगाव जामोद तालुक्यात आहे आणि हा तालुका बुलढाणा जिल्ह्यात येतो. या घटमांडणीतून येणाऱ्या वर्षाचे अंदाज बांधले जातात जे 90 % खरे ठरताना दिसून येतात.
भेंडवळ घटमांडणी कशी करतात?
ही घटमांडणी त्याच शेतात केली जाते जिथे इतक्या वर्षांपासून करण्यात येत आहे. यामध्ये कोणतेही बदल केले जात नाही. शेतात जिथे ती जागा आहे त्या ठिकाणी सर्वप्रथम स्वच्छता केली जाते आणि एक 2 ते 3 फूट खोल खड्डा केला जातो. त्याच खड्यातून निघणारे खरबुजाच्या आकारासारखे 4 ढेकूळ ठेवण्यात येतात म्हणजेच संपूर्णतः मातीचे मोठे गोटे असे म्हणता येईल.
ढेकूळांची योग्य मांडणी झाल्यावर त्यावर पांढरा दोरा बांधून करवा म्हणजेच मातीची लहान घागर ठेवण्यात येते. ही घागर ठेवल्यानंतर ज्या महाराजांनी ही परंपरा सुरू केली त्यांचा जयजयकार “चंद्रभान महाराज की जय” असे म्हणत घागरीमध्ये पाणी भरेपर्यंत पाणी भरण्यात येते. आता या करव्यावर पुरी, सांडोळी, कुरडई, भजे, वडा, करंजी, ई. खाद्य पदार्थ ठेवण्यात येतात.
आता ह्या सर्व मांडणीच्या बाजूला खड्ड्यामध्येच सुपारी आणि त्याखाली रुपया व त्याखाली नागवेली किंवा ज्याला आपण विड्याची पाने असे संबोधतो ती ठेवण्यात येतात. आता याच खड्याच्या भोवती अंदाजे 2 ते 3 फुटावर वर वर्तुळाकार धान्यांची मूठ भरून धान्य ठेवल्या जाते आणि त्यातील प्रत्येक दाणा हा मांडणीच्या बाहेर जाऊ नये असा मांडला जातो.
प्रत्येक धान्य ठेवल्यानंतर त्यामध्ये अंदाजे अर्धा किंवा 1 फुटाचे अंतर ठेऊन दुसरे धान्य ठेवण्यात येते आणि असे 18 प्रकारचे धान्य जसे कि लाख, तूर, मूग, बाजरी, मोठ, गहू, हरभरा/चना, जवस, तीळ, उडीद, भादली, तांदूळ, करडी, बाजरी, मसूर, सरकी, अंबाडी, ज्वारी, वटाना त्या खड्ड्याच्या भोवती ठेवण्यात येतात.
ही भेंडवळची घटमांडणी ज्या दिवशी भाकीत वर्तविण्यात येते त्या दिवसाच्या आधीच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास सूर्यास्ताच्या आधी केली जाते. मांडणी झाल्यावर 5 महाराज लोक हे मावळत्या सूर्याच्या पाया पडून 5 वेळ नमस्कार करण्यात येतो आणि चंद्रभान महाराजांचा जयघोष करण्यात येतो व रात्रभर घटमांडणीला एकांतात सोडून त्यामध्ये जे बदल होतात ते दुसऱ्या दिवशी सकाळी सुर्योदयावेळी वर्तविण्यास सुरुवात होते.
भेंडवळ घटमांडणीमध्ये भाकीत कसे वर्तविण्यात येते आणि ठेवण्यात आलेल्या वस्तूंचे महत्व काय?
भेंडवळ घटमांडणीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजेपासून महाराष्ट्रातून व देशातून विविध ठिकाणाहून आलेले लोक हे घटमांडणीच्या शेतात जमू लागतात. त्यांनतर सकाळी 6 वाजताच्या सुमारास या घटमांडणीचे भाकित वर्तवण्यास सुरुवात करण्यात येते. आता घटमांडणीच्या मुख्य वस्तू कशाच्या प्रतीक आहेत आणि त्यांचे भाकीत कसे ठरविण्यात येते हे खालील प्रमाणे आहे :-
1) मातीचे 4 ढेकूळ :- पावसाळ्याचे 4 महिने म्हणजेच जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरला दर्शवतात. घागरीखालील ढेकूळांचे भिजण्याचे प्रमाणावरून अवलोकन करण्यात येते. जर त्यांच्या पैकी एक ढेकूळ हे इतरांपेक्षा जास्त ओले असल्यास त्यामहिन्यामध्ये सर्वाधिक पाऊसाची शक्यता वरविण्यात येते. जे ढेकूळ इतर ढेकूळांपेक्षा कमी प्रमाणात भिजलेले असेल तर त्यावरून त्या महिन्यात कमी पाऊसाची शक्यता वर्तविण्यात येते. जे ढेकूळ भिजलेलेच नसेल तर त्या महिन्यामध्ये पाऊसाची शक्यता नाहीच्या जवळपास सांगण्यात येते. जे ढेकूळ सर्वाधिक भिजून त्याच्या आकारात बदल किंवा त्याचे भाग झाल्यास त्या महिन्यामध्ये पिकांचे नुकसान व अत्याधिक पाऊस वरविण्यात येतो. अवकाळी पाऊसाची शक्यता सुद्धा यावरूनच वर्तविण्यात येते.
2) घागरीवरील पुरी :- पुरी जर ठेवल्या ठिकाणी नसेल तर पृथ्वीवर संकट येईल असे सांगण्यात येते. पुरी जर जरा प्रमाणात सरकलेली असेल तर पृथ्वीला धोकादायक स्थितीचा अनुभव करावा लागू शकतो असे सांगण्यात येते आणि जर पुरीला काहीही झालेले नसेल म्हणजे ठेवल्याप्रमाणेच पुरी असेल तर पृथ्वीला धोका नाही असे सांगण्यात येते.
3) नागवेलीचे पान, रुपया आणि सुपारी :- या नागवेलीच्या पानांना म्हणजेच विड्याच्या पानांना, रुपयाला आणि सुपारीला विशेष महत्व आहे. सुपारी म्हणजेच गणपतीचे स्वरूप मानल्या जाते. तसेच राजकीय महत्व असे कि सुपारीला देशाच्या मुख्य पदावर विराजमान व्यक्तीच्या स्वरूपात देखील मानल्या जाते आणि “राजा” म्हणून संबोधण्यात येते. राजकीय महत्व असे कि सरकार स्थिर राहील किंवा नाही म्हणजेच देशाचे मुख्य सूत्र ज्यांच्या हातात असतात तेच लोक त्या गादीवर कायम राहतील अथवा नाही याचे देखील अवलोकन या मार्फत केल्या जाते. सुपारी जर जागेवरून जराही हलली नसल्यास राजाची गादी कायम असल्याचे सांगण्यात येते. सुपारी जर जरा प्रमाणात जागेवरून हलली असल्यास राजाच्या गादीला धोका आहे असे सांगण्यात येते. सुपारी जर जागेवरून पूर्णतः बाजूला सरकली असल्यास किंवा त्या ठिकाणी आढळून न आल्यास राजा बदलेल किंवा सरकार बदलेल याचे संकेत देण्यात येतात.
5) वडा, भजे, सांडोळी, कुरडई, करंजी:- यांच्याबाबतीत सांगायचे झाल्यास सांडोळी, कुरडई हे चारा-पाणी म्हणून तर वडा आणि भजे हे चव म्हणून संबोधण्यात आले आहेत. त्यांची स्थिती ठेवण्यात आल्या प्रमाणे आढळून आल्यास चांगल्या प्रकारचे चारा-पाणी उपलब्ध असेल असे सांगण्यात येते. जागा बदलली असल्यास कमी होण्याचे प्रमाण दर्शविण्यात येते आणि तिथे नसल्यास फार मोठे संकट येऊन चारा-पाणी उपलब्धता नाहीच्या प्रमाणे असेल असे सांगण्यात येते. करंजीच्या बाबतीत असे कि करंजी विखुरलेल्या अवस्थेत आढळून आल्यास पैश्यांची अडचण निर्माण होण्याची शक्यता वरविण्यात येते. करंजी जशास तशी असल्यास आर्थिक स्थिती जशी आहे तशी राहील असे सांगण्यात येते. करंजी जागेवर नसल्यास आर्थिक परिस्थिती गंभीर असू शकते असे सांगण्यात येते.
6) मसूर :- मसूरला देशाच्या आजूबाजूच्या असलेले देश म्हणून संबोधण्यात येते. ठेवल्याप्रमाणे काहीही बदल नसल्यास शेजारी देशांकडून काहीही अडचण नाही असे सांगण्यात येते. ज्याप्रमाणे हालचाल दाण्यांची असेल त्याप्रमाणे शेजारी देशांचे संबंध कसे असतील हे सांगण्यात येते.
7) अंबाडी :- आंबडीला कुलदैवत म्हणून संबोधण्यात आले आहे तरी ठेवल्याप्रमाणे असल्यास, जागेवरून हालचाल झाल्यास त्याप्रमाणे कुलदैवतेचा प्रकोप होईल किंवा नाही हे सांगण्यात येते.
8) भादली :- भादली हे पीक मुख्यतः घेण्यात येत नसल्याचे सांगण्यात येते त्यामुळे त्याचे महत्व हे पिकांवर होणाऱ्या रोगराईच्या अनुषंगाने ठरविण्यात येते. हलचालीप्रमाणे किंवा ठेवल्याप्रमाणे असल्यास त्याचे महत्व हे सांगण्यात येते व रोगराई येईल किंवा नाही त्याचे भाकीत वर्तविण्यात येते.
9) करडी :- करडी हे पीक म्हणून सुद्धा संबोधले जाते परंतु जास्त महत्व हे देशाचे संरक्षण परकीय आक्रमणापासून होईल किंवा नाही हे त्याच्या जागेच्या हालचालीवरून ठरविण्यात येते.
9) तूर, तीळ, बाजरी, वाटाणा, ज्वारी, तांदूळ, जवस, वटाना, लाख :- पिकांबाबत किती बोट बाहेर-आत किंवा इतर पिकांच्या दाण्याकडे पिकांचे दाणे गेले आहेत यावरून अंदाज लावण्यात येतो. जसे कि दाणा बाहेर सरकल्यास साधारण पीक होईल असे सांगण्यात येते. दाणा हा दुसऱ्या पिकाच्या दाण्याजवळ गेला असल्यास भाव चांगले मिळण्याची शक्यता असते असे भाकीत करतात. दाणा मधोमध असलेल्या घागरीच्या दिशेने गेल्यास पीक चांगले येईल परंतु भाव मिळण्याची शक्यता कमी आहे असे सांगण्यात येते. शेवटचे म्हणजे दाणे जर सर्व दिशेने विखुरले असल्यास पीक सर्वोत्तम होईल असे सांगण्यात येते. पिकांच्या दाण्यांचा रंग हा काळा पडल्यास किंवा रंगात इतर काही बदल झाल्यास अवकाळी पाऊसाची शक्यता वर्तविण्यात येते.
10) मुंगी, म्हैस, झुरळ, इ. जीवजंतू :- अश्या प्राण्यांचा उल्लेख हा यासाठी करण्यात येतो कारण काल सायंकाळ ते दुसऱ्या दिवशीच्या पहाटेपर्यंत मानवी हस्तक्षेपाविना जे बदल या प्राण्यांमुळे घटमंडणीची होतात त्यांची उपस्थिती शेवटी सांगण्यात येते.
भेंडवळ घटमांडणी विश्वासात्मक आहे का?
जाणकारांच्या व परिसरातील शेतकऱ्यांच्या अनुभवावरून असे सांगण्यात येते की त्यांना 80-90% सांगितलेले भाकीत खरे ठरलेले पाहायला मिळाले आहे. त्यामुळे हजारोंच्या संख्येने राज्यातून व देशातून लोक हा कार्यक्रम पाहण्यास उत्सुक असतात. काही लोक अंधश्रद्धा म्हणून सुद्धा या प्रथेला संबोधतात.
भेंडवळचा हा कार्यक्रम पाहण्यासाठी कसे जात येईल?
भेंडवळ घटमांडणीचा कार्यक्रम पाहण्यासाठी जर तुम्हाला जायचे असेल तर सकाळी लवकर किंवा आधीच्या दिवशी जावे लागेल कारण सकाळी सूर्योदय होताच 6 वाजता भाकीत सांगायला सुरुवात होते आणि जर तुम्ही वेळेनंतर पोहोचले तर तुम्हाला तिथे कोणीही सापडणार नाही. त्यामुळे तुम्हाला भाकीत ऐकण्यासाठी वेळेवर पोहोचायचे असल्यास खालील लिंकवर क्लिक करून अंतर आणि पोहोचण्यासाठी लागणारा वेळ जाणून घ्या.
भेंडवळला जाण्यासाठी मार्ग व वेळ
भेंडवळ घटमांडणीचे यावर्षीचे भाकीत काय?
दरवर्षी होणाऱ्या या शेतकऱ्याच्या आस्थेचा भाग असलेल्या प्रथेचे भाकीत यावर्षी सुद्धा दर्शविण्यात आले आहे. या वर्षीचे भाकीत वाच्यण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
भेंडवळ घटमांडणीचे यावर्षीच्या भाकितासाठी क्लिक करा
शेतकरी हेल्पलाईन म्हणून आम्ही आपल्यापर्यंत योग्य माहिती पोहोचविण्याचे प्रयत्न करत असतो आणि या माहितीला आपला अत्यंत चांगला प्रतिसाद नेहमी मिळाला आहे. आपल्या याच विश्वासावर आम्ही खरे उतरण्याचे नेहमी प्रयत्न करत आहोत आणि त्यामुळेच शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय सुद्धा आहोत. वरील माहिती आपल्याला आवडली असेल तर शेतकऱ्यांना नक्की पाठवा आणि तुमच्या जिल्ह्याच्या वॉट्सप ग्रुपला जुळण्यासाठी स्क्रीनवर असलेले हिरवे बटन दाबा.