महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या मदतीस कार्यरत असलेले एकमेव माहितीपूर्ण संकेतस्थळ
व्यापाऱ्यांची मालमत्ता जप्त करून शेतकऱ्यांचे…, पणन संचालकांना कृषिमंत्री कोकाटेंचे सक्त आदेश

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्याच्या उमराण येथील खासगी बाजारात अनेक शेतकऱ्यांनी आपले कांदा, टमाटे आणि इतर भाजीपाला विकला होता. मात्र विक्रीनंतर कोट्यवधी रुपयांचे पैसे अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. शेतकरी वारंवार पैसे मागण्यासाठी व्यापाऱ्यांकडे गेले, तरीही त्यांच्याकडून वेळकाढूपणा व टाळाटाळ केली जात आहे. परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी तातडीने लक्ष घालून, पणन संचालकांना स्पष्ट आदेश दिले आहेत कि, “ज्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पैसे अडवले आहेत, त्यांच्या मालमत्तेवर जप्ती आणा, जमिनींचा लिलाव करा आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांचे थकीत पैसे अदा करा.”
कोकाटे बोलताना पुढे म्हणाले, “शेतकरी रात्रंदिवस मेहनत करून माल तयार करतो, बाजारात विकतो, पण त्याला जर त्याचे पैसेच मिळाले नाहीत, तर ही संपूर्ण व्यवस्था अपयशी ठरते. बेजबाबदार व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई केली गेली पाहिजे. म्हणूनच मी स्पष्ट आदेश दिले आहेत की व्यापाऱ्यांची मालमत्ता जप्त करून शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे दिले जावेत. येत्या आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजेत. कुणाची पत्नी आजारी आहे, कुणी कर्जात आहे, कुणी शेतीसाठी नवे कर्ज घेतलंय अशा अनेक गरजांमध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांचा पैसा व्यापाऱ्यांकडे अडकून राहिला तर शासन म्हणून आम्ही गप्प बसणार नाही.”
या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. वर्षानुवर्षे व्यापाऱ्यांच्या मनमानीने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना आता सरकारकडून ठोस मदत मिळेल अशी अपेक्षा आहे. याचबरोबर कृषिमंत्री कोकाटे यांनी असेही आदेशीत केले कि, “खाजगी बाजार समित्या जर शेतकऱ्यांच्या मालाची जबाबदारी घेण्यास तयार नसतील, तर अशा समित्यांना तात्काळ निलंबित करा. शासनाचा उद्देश फक्त मधल्या साखळीचा भाग होणे नाही, तर शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी निर्णायक पावले उचलणे हाच आहे.”
संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांकडून अशा प्रकारच्या तक्रारी आल्याने हा निर्णय व्यापक परिणाम घडवणारा ठरू शकतो त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या थकलेल्या रकमेची फेड व्यापारी वर्ग करेल असा विश्वास निर्माण झालेला दिसून येत आहे.