महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या मदतीस कार्यरत असलेले एकमेव माहितीपूर्ण संकेतस्थळ
सौर कुंपण करणार शेतकऱ्यांचे आर्थिक बळकटीकरण, भारतातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्याचा मानस

गुजरातच्या गांधीनगरात झालेल्या रिइन्वेस्ट 2024 या कार्यक्रमादरम्यान जर्मन आर्थिक सहकार्य आणि विकास मंत्री स्वनिया शलत यांच्या उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण करार झाला आहे. या करारामुळे सौर ऊर्जा आणि शेती या दोन क्षेत्रांमध्ये क्रांतिकारी तंत्रज्ञानाच्या वापरास सुरुवात होणार आहे. भारतातील एग्री विजय कंपनी आणि जर्मनीच्या नेक्स्ट टू सन कंपनी यांच्यात गांधीनगर येथे हा महत्वपूर्ण करार झाला असून, शेतीत उभ्या सौर पाट्या म्हणजेच इंग्रजीत Vertical Photovoltaic Solar System (VPSS) असे म्हणतात.
भारत कृषिप्रधान देश असल्यामुळे हे तंत्रज्ञान अतिशय महत्त्वाचे मानले जात आहे. शेती आणि सौर ऊर्जेला एकत्रित आणत शेतकऱ्यांना केवळ अन्नदाता नव्हे तर ऊर्जादाता देखील बनवण्याचा हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. शेतकरी आपल्या शेतजमिनीचा वापर सौर ऊर्जा उत्पादनासाठी करू शकतो आणि या वीजेची विक्री करून अतिरिक्त उत्पन्न देखील मिळवू शकतो याची खात्री या करारातुन दोन्ही कंपन्या देताना दिसून येत आहेत. यामुळे भारताचे नेट-झिरो (net-zero) लक्ष्य साध्य करण्यात मदत होईल तसेच देशाच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करता येतील.
महाराष्ट्रातील शेतकरी देखील या तंत्रज्ञानाचा फायदा घेऊ शकतात. राज्यातील मोठ्या शेतजमिनी आणि शेतीला आवश्यक असलेले भरपूर ऊन यामुळे, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वर्टिकल सोलर पॅनल्स बसवून वीज निर्मितीचा उत्तम पर्याय उपलब्ध होऊ शकतो. हे तंत्रज्ञान उन्हाळ्यात जेव्हा शेतीसाठी पाण्याची उपलब्धता दिसून येत नाही तेव्हा शेतकऱ्यांना वीज निर्मितीचा नवा मार्ग मोकळा करून देत आहे. या वीजेची विक्री करून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळेल, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थैर्यात भर पडेल. तसेच, महाराष्ट्रात वाढत्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आगामी काळात सौर ऊर्जा हा एक शाश्वत पर्याय ठरू शकतो.
जर्मनीमध्ये या तंत्रज्ञानावर आधीच भरपूर काम झालेले आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पारंपारिक आडव्या (हॉरिझॉन्टल) पाट्यांच्या तुलनेत कमी जागेत वीज निर्मिती करता येईल. उभ्या पाट्यांमुळे न फक्त 1% पेक्षा कमी जागेचा वापर होईल त्याशिवाय उर्वरित जागेत शेती सुद्धा करता येईल. सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस समान प्रमाणात वीज निर्मिती करणारे ह्या सोलर पाट्या असून यामुळे उर्जानिर्मितीचा जास्तीत जास्त वेळ वाढवता येणार आहे.
गुजरात हे राज्य अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात झपाट्याने पुढे जात आहे. कच्छच्या रणात बनवला जात असलेला खावडा सोलर पार्क हा जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा पार्क ठरणार आहे. महाराष्ट्रातील शेतकरी सध्या महाराष्ट्रात राबिण्यात येणाऱ्या मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेच्या मार्फत शेतातील पाण्याच्या स्रोतासाठी आडव्या पाट्यांचे पंप त्यांच्या शेतात बसवून घेत आहेत. या क्षेत्रात देखील पुढाकार घेऊन सौर ऊर्जेतून वीज निर्मिती करून राज्याच्या आणि देशाच्या ऊर्जेच्या गरजा शेतकरी भागवू शकतात.
जर्मन आर्थिक सहकार्य मंत्री स्वनिया शलत यांनी त्यांच्या प्रतिनिधी मंडळासह रिइन्वेस्ट 2024 मध्ये भाग घेतला. त्यांचे मत आहे की, भारत आणि जर्मनी यांच्या सहकार्यामुळे अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात मोठी प्रगती होऊ शकते. दोन्ही देशांचे अनुभव इतर देशांसाठी देखील आदर्श ठरू शकतात.
जगाची वाढती लोकसंख्या आणि वेगाने होणारा आर्थिक विकास यामुळे ऊर्जेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. या ऊर्जेच्या वाढत्या गरजा भागविण्यासाठी अक्षय ऊर्जेत अधिकाधिक गुंतवणूक करणे गरजेचे आहे, असे मत या करारादरम्यान व्यक्त करण्यात आले.