महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या मदतीस कार्यरत असलेले एकमेव माहितीपूर्ण संकेतस्थळ
यावेळी कसा राहिल मान्सून? दुबार पेरणीची वेळ येईल का जाणून घ्या…

Monsoon forecast 2024|पाऊस म्हटले की शेतकऱ्यांसाठी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे महिने अतिशय महत्त्वपूर्ण असतात. या महिन्यांमध्ये लावण्यात येणारी अधिकतम पिके पावसावर निर्भर असतात. त्यानंतर येणारे महिने धरणाच्या, विहिरींच्या, तसेच नदीच्या पाण्यावर अवलंबून असतात. परंतु या जलसाठ्यांमध्ये पाणी असण्यासाठी जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यांमध्ये वर्षाव होणे अत्यंत गरजेचे आहे. सदर महिन्यांमध्ये होणारा पाऊस समाधानकारक झाला तरच येणाऱ्या पुढील महिन्यांमध्ये जलसाठ्यांमध्ये पाणी उपलब्ध असेल.
मागच्या वर्षी अल-निनो परिस्थितीमुळे राज्याच्या काही भागांमध्ये पावसाचा मोठा खंड पडला होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ आली. काहींना तर तिसऱ्यांदा पिक पेरावे लागले. अशातच शेतकऱ्यांचा खर्च वाढला आणि अवकाळी पावसाचा, वारा, वादळाचा देखील फटका बसला. परंतु, यावर्षी स्थिती वेगळी असण्याची शक्यता आहे कारण अल-निनो चा प्रभाव कमी होत असून ला-नीना सक्रिय होताना दिसत आहे आणि ही बाब शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे.
अल-निनो आणि ला-नीना म्हणजे काय?
अल-निनो
अल-निनो ही परिस्थिती तेव्हा होते जेव्हा मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरामध्ये समुद्राचे पाणी साधारणपेक्षा जास्त गरम होते. याचा भारतातील पर्जन्यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम दिसतो, ज्यामुळे पावसाची शक्यता कमी होते. जर ही स्थिती बिकट झाली म्हणजेच तापमान वाढले तर भारतासाठी हे धोकादायक ठरू शकते, ज्यामुळे दुष्काळ पडू शकतो.
ला-नीना
ला-नीना परिस्थितीत उलट आहे. पूर्व आणि मध्य प्रशांत महासागराचे तापमान साधारणपेक्षा कमी होते आणि हा भाग थंड होतो. भारतावर याचा परिणाम असा होतो की जितका जास्त हा भाग थंड होईल तितके जास्त पावसाचे प्रमाण भारतात दिसून येते. जर हे भाग आवश्यकतेनुसार थंड झाले तर पावसाचे प्रमाण व्यवस्थित राहील, ज्यामुळे जलसाठ्यांमध्ये मुबलक पाणी उपलब्ध होईल. परंतु जर फारच थंड झाले तर भारतात पूरजन्य स्थिती निर्माण होऊ शकते.
अल-निनो आणि ला-नीनाचे शेतीवर होणारे प्रभाव
अल-निनो परिस्थिती शेतकऱ्यांसाठी अत्यंत धोकादायक असून, यामध्ये कोरडे व दुष्काळ पडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे शेती खर्चिक होते आणि उत्पादन क्षमता घटते. तसेच कृत्रिम सिंचनावर जास्त खर्च होतो.
ला-नीना परिस्थिती शेतकऱ्यांसाठी पोषक आहे. यामध्ये पावसाचे प्रमाण वाढते. परंतु, शेतकऱ्यांना पाटांचे तसेच कालव्यांचे नियोजन करावयास लागते. शेतामध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. ही स्थिती बिकट झाल्यास पूर येऊ शकतो, ज्यामुळे नुकसान होऊ शकते. मागील काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांना या स्थितीचा फायदा जास्त झाला आहे.
यावर्षीची स्थिती
यावर्षीची स्थिती अशी आहे की अल-निनो निवळत असून ला-नीना परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने जास्त पर्जन्याचे प्रमाण राहील असे सांगितले आहे. जास्त पर्जन्यामुळे यावेळेस शेतीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होईल. फक्त शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन व्यवस्थित करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी या परिस्थितीला ओळखून पिकांचे नियोजन केल्यास त्यांना फायदा होईल.
2024च्या मान्सूनचे दीर्घकालीन अंदाज
डॉ. मृत्युंजय महापात्र, महासंचालक (हवामान विज्ञान), यांनी 2024 मान्सून हंगामाचा (जून–सप्टेंबर) दीर्घकालीन अंदाज अद्यतनित केला आहे. यामध्ये जून 2024 साठी मासिक पर्जन्य आणि तापमानाचा अंदाजही जाहीर केला आहे.
चार भागांसाठी जाहीर करण्यात आलेले हवामान अंदाज
उत्तर-पश्चिम भारत
– पर्जन्य प्रमाण: 92-108% LPA
– जूनमध्ये सामान्य ते कमी पाऊस
– जूनमध्ये सामान्य ते जास्त तापमान
मध्य भारत
– पर्जन्य प्रमाण: >106% LPA
– जूनमध्ये सामान्य ते जास्त पाऊस
– जूनमध्ये सामान्य ते जास्त तापमान
दक्षिण भारत
– पर्जन्य प्रमाण: >106% LPA
– जूनमध्ये सामान्य ते जास्त पाऊस
– जूनमध्ये सामान्य ते कमी तापमान
उत्तर-पूर्व भारत
– पर्जन्य प्रमाण: <94% LPA
– जूनमध्ये सामान्य ते कमी पाऊस
– जूनमध्ये सामान्य ते जास्त तापमान
महाराष्ट्रासाठी हवामान अंदाज आणि कधीपर्यंत येणार
– 2024 च्या मान्सून हंगामात (जून-सप्टेंबर) महाराष्ट्रात सामान्यपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे.
– मध्य आणि दक्षिण महाराष्ट्रात पाऊस जास्त होण्याची शक्यता आहे.
– जूनमध्ये सामान्य ते जास्त पाऊस
– जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात सामान्यपेक्षा जास्त पाऊस असू शकतो.
शेतकरी हेल्पलाईन काय सांगते?
शेतकरी हेल्पलाईन सांगते कि, “महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या पावसाचे नियोजन करून शेतीची तयारी करावी आणि जलसंधारणावर भर द्यावा. पावसाच्या प्रमाणामुळे होणारे फायदे साधण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. या दोन्ही परिस्थिती अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. मागील काही काळामध्ये या परिस्थितीमुळे पाऊस जगभरामध्ये पडलेला आहे. त्यामुळे या स्थिती शेतीच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले आहे. IMD म्हणजेच भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या हवामानाच्या परिस्थितीवर आधारित, शेतकऱ्यांनी पिकांच्या लागवडीचे नियोजन करावे आणि संभाव्य पूर स्थितीचा विचार करून आवश्यक उपाययोजना कराव्यात.” शेतकरी हेल्पलाईन 24 तास कार्यरत असून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्याकरिता निरंतर प्रयत्न करत आहे. शेतकरी हेल्पलाईनच्या जिल्ह्याच्या व्हाट्सअप ग्रुपला जुळण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या हिरव्या बटणावर क्लिक करा.