महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या मदतीस कार्यरत असलेले एकमेव माहितीपूर्ण संकेतस्थळ
सोयाबीनवर येणाऱ्या रोगराईला टाळण्यासाठी बीजप्रक्रिया मार्गदर्शन व माहिती

विदर्भामध्ये कापूस पिकानंतर सोयाबीन पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. सोयाबीन पिकावर प्रामुख्याने खोडमाशी, चक्रीभुंगा, उंटअळी तसेच मागील वर्षी चारकोल रॉट, शेंगेवरील करपा व पानावरील ठिपके या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून आला होता. त्यामुळे सोयाबीन पिकावर येणाऱ्या कीड व रोग टाळण्याकरिता तसेच त्यांचे प्राथमिक अवस्थेत व्यवस्थापन होण्याकरिता पेरणी अगोदर बीजप्रक्रिया करणे अत्यंत महत्वाची ठरू शकते.
बीजप्रक्रिया का करावी?
खोडमाशीसाठी उष्ण तापमान, जास्त आर्द्रता, जास्त पाऊस, व त्यानंतर कोरडे वातावरण पोषक आहे. तसेच सोयाबीन पिकाच्या रोपावस्थेत पोषक वातावरणामुळे उदा. जास्त पाऊस, जास्त आर्द्रता आणि शेतात पाणी साचल्यामुळे मुळकुज व खोडकुज या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. जमिनीमध्ये वास्तव्य करणार्या बुरशीमुळे पिकांवर येणाऱ्या बुरशीजन्य रोगांचे व्यवस्थापन बुरशींनाशकाची बीजप्रक्रिया करून टाळता येते. खोडमाशी व रस शोषण करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन कीटकनाशकाची बीजप्रक्रिया केल्याने पीक किमान एक महिना सुरक्षित राहते. तसेच जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया केल्यामुळे बियाण्याची उगवण क्षमता वाढते, रोपांची वाढ जोमाने होते, उत्पादनात वाढ होऊन जमिनीची सुपीकता वाढते.
बीजप्रक्रियेसाठी कोणत्या औषधी वापराव्यात व ती कशी करावी?
1. रासायनिक बुरशीनाशक:
– कार्बोक्झिन ३७.५% + थायरम ३७.५% (संयुक्त बुरशीनाशक) ३ ग्रॅम प्रती किलो बियाणे
2. कीटकनाशक:
– थायामेथोक्झाम ३०% एफ.एस. १० मिलि प्रती किलो बियाणे
3. जिवाणू संवर्धक:
– रायझोबियम जापोनिकम २५ ग्रॅम
– स्फुरद विरघडविणारे जिवाणू (पी.एस.बी.) २५ ग्रॅम प्रती किलो बियाणे
तसेच मागील वर्षी सोयाबीन पिकावर आलेल्या चारकोल रॉट रोगाची बुरशी फळे ही जमिनीमध्ये जीवंत असल्यामुळे पेरणी अगोदर ट्रायकोडार्मा २ किलो/लीटर (लेबल क्लेम/शिफारशीत नाही) २५ ते ३० किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून जमिनीवर फेकावा म्हणजेच मातीप्रक्रिया करावी व त्यानंतर ४ ते ५ ग्रॅम प्रती किलो बियाण्यास चोळून बीजप्रक्रिया करावी.
सामाजिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेला बीजप्रक्रिया व्हिडीओ
शेतकरी हेल्पलाईन काय सांगते?
शेतकरी हेल्पलाईन सांगते की सोयाबीनच्या बियांना बुरशीच्या तसेच किडीच्या नुकसानापासून वाचवण्यासाठी आणि रोगराई पासून दूर ठेवण्यासाठी बीज प्रक्रिया नक्की करा. बीजप्रक्रिया केल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी भर पडताना पाहायला मिळाली आहे. बीज प्रक्रियेसाठी वरील सुचविलेले घटक असलेल्या औषधींचे वापर अतिशय चांगले परिणामकारक आहे. वरील माहिती ही तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार प्रसारित करण्यात आलेली आहे. तुमच्या जिल्ह्याचे शेतकरी ग्रुपला जुळण्यासाठी स्क्रीन वरील हिरवे बटन दाबून जॉईन करा.