महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या मदतीस कार्यरत असलेले एकमेव माहितीपूर्ण संकेतस्थळ
राजाचं काय होणार आणि पीक कसे येईल, भेंडवळचं 371 व्या वर्षाचं भाकीत वाचा…

भेंडवळ घटमांडणी ही जगप्रसिद्ध अशी घटमांडणी असून देशाच्या राजापासून तर शेताच्या सर्जापर्यंतचे भाकीत दरवर्षी करताना पाहायला मिळते. विशेष म्हणजे हे भाकीत 80 ते 90% खरे ठरते असे स्थानिकांचे म्हणणे आहे परंतु तुम्ही कधी याबाबत ऐकले होते का? तर चला मग काय म्हणते 2024ची घटमांडणी माहिती घेऊया आणि आपल्या शेतातील पिकांचे योग्य नियोजन करूयात.
चंद्रभान महाराज वाघ यांचे वंशज पुंजाजी महाराज वाघ आणि सारंगधर महाराज वाघ हे 371 वर्षांची परंपरा जपत गुढी पाडवा ते अक्षय्य तृतीया या सणांच्या कालावधीतहे घटमांडणी करून देशासाठी अनुकूल व चिंताजनक परिस्थितीचा आढावा अवघ्या 12 ते 14 तासांमध्ये दरवर्षी न चुकता जाहीर करतात. वस्तू ठेवल्यानंतर रात्रभरामध्ये होणारे बदल दुसऱ्या दिवशी सकाळी 6 ला निरीक्षण करून सर्वश्रुत केले जातात. हे पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक भेंडवळला जे की जळगाव जामोद तालुक्यात आहे आणि बुलढाणा जिल्ह्यात स्थित आहे तिथे येत असतात. भेंडवळची 2024 ची भाकिते खालील प्रमाणे आहेत :-
1) पिकांच्या संदर्भात :-
1. कापूस :- कपाशीच्या संदर्भात सारंगधर महाराज वाघ यांनी मोगम असा शब्द वापरला आहे म्हणजेच अनिश्चित आहे असे सांगितले आहे. काही भागात जास्त येऊ शकते तर काही भागात कमी येऊ शकते असे सांगितले आहे कारण पहिल्या महिन्यात त्याची पेर झाल्यास पावसाची शक्यता कमी सांगितली आहे.
2. ज्वारी :- ज्वारीच्या पिकबद्दल सुद्धा अनिश्चितता दर्शवली आहे म्हणजेच तुम्हाला पेरणी ही व्यवस्थित महिना पाहून करावी लागणार आहे तरच आपल्या कष्टाचे फलित होईल.
3. तूर :- तूर सुद्धा अनिश्चित आहे असे सांगितले आहे आणि गेल्या 2 ते 3 वर्षात तूर मांडणीमध्ये बदल दिसून येत होता परंतु यावर्षी हालचाल फारशी नाही त्यामुळे अनिश्चितता आहे. कुठे कमी तर कुठे जास्त उत्पादन होऊ शकते असे सांगण्यात आले.
4. मूग :- मूगसुद्धा मोगम आहे म्हणजेच अनिश्चितता आहे आणि जपून आपली पेरणी पाण्यापावसाचा अंदाज घेऊनच करण्याचा सल्ला मिळताना दिसून येत आहे.
5. उडीद :- उडीदाचे 1 दाणे हे आतल्या दिशेला आहे म्हणजेच जिथे मधोमध करवा ठेवण्यात आला आहे त्या दिशेला तो 1 दाणा सरकला आहे. पीक चांगले येईल असे सांगितले आहे परंतु हवा त्याची फारशी राहणार नाही असे सांगितले आहे म्हणजेच भावात कमी होताना दिसून येऊ शकतात असा संदर्भ निघताना दिसत आहे.
6. तीळ :- तिळाचे पीक सुद्धा चांगले आहे व आजूबाजूने सर्व दिशेला विखुरले आहे असे सांगण्यात आले आहे. तिळाला मागणी असून त्याला भाव चांगला मिळेल हे भाकीत वर्तविण्यात आले आहे.
7. भादली :- भादली ही सर्व दिशेला विखुरलेली आहे. पीक म्हणून ह्या पिकाला जास्त प्रमाणावर कोणी उत्पादन घेत नाही परंतु पिकांवर रोगराई येईल किंवा नाही याचे सूचक म्हणून भादली ठेवलेली आहे असे दिसून येते व पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव असेल आणि त्याचे योग्य नियोजन शेतकऱ्यांनी करायला हवे असे सांगण्यात आले आहे.
8. बाजरी :- बाजरीच्या ठेवणीतून एक दाना बाहेरच्या दिशेला म्हणजेच करव्याच्या विरुद्ध दिशेला गेला आहे आणि म्हणून साधारण पीक येईल असे सांगण्यात आले आहे.
9. मठ :- बाहेरच्या दिशेला दोन बोटावर एक दाणा आहे असे सांगितले आहे व त्याला भाव चांगला उपलब्ध होईल असे वर्तविण्यात आले आहे.
10. साळी/तांदूळ :- बरेच लोक याना धान म्हणून देखील संबोधतात तर यावर महाराजांनी तांदूळ चांगल्याप्रकारे येईल असे सांगितले आहे.
11. जवस :- जवस हे आजूबाजूला सर्व दिशेला जास्त प्रमाणात विखुरलेले आहे त्यामुळे पीक चांगले होईल परंतु नुकसान सुध्दा मोठ्याप्रमाणावर होऊ शकते याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी असे महाराजांनी सांगितले आहे.
12. लाख :- लाख हे कायम असून ज्याप्रमाणे ठेवले होते त्याचप्रमाणे आहे त्यामुळे अनिश्चित मिक दिसून येते असे सांगण्यात आले आहे.
13. वाटाणा :- बाहेरच्या दिशेला काही प्रमाणात गेला आहे त्यामुळे साधारण पीक होईल असे सांगण्यात आले आहे.
14. गहू :- बाहेरच्या दिशेला विखुरलेले असून एक दाणा 8 बोट बाहेर गेला आहे आणि एक दाणा हरभऱ्याजवळ सुद्धा गेला आहे त्यामुळे याचा अर्थ असा कि गव्हाचे उत्पादन चांगले होईल व त्याला भाव देखील चांगला मिळेल.
15. हरभरा/चना :- हरभऱ्याचे 2 दाणे आतल्या दिशेला गेले असून 1 दाणा 1 फुटांपर्यंत आत गेला आहे असे सांगतात. पीक साधारण येईल व भावात फार बदल दिसून येणार नाहीत.
16. करडी :- करडीचे 1 दाणे 6 बोटांवर बाहेर आहे तर 1 दाणा आतल्या दिशेला 1 फूट आहे तर करडीचे फारसे पीक म्हणून महत्व सांगितले नाही. त्याचे महत्व देशासाठी जास्त आहे असे सांगितले आहे.
17. मसूर :- मसूर हे पीक अनिश्चित आहे असे सांगितले आहे व त्याचे महत्व देशासाठी जास्त आहे असे नमूद करण्यात आले आहे.
2) पावसाच्या संदर्भात :-
1. पाहिले ढेकूळ कमी भिजलेले असल्यामुळे जून महिन्यात पाऊस फार कमी व तुरळक ठिकाणी होईल असे वर्तवण्यात आले आहे.
2. जुलै महिन्यात जून महिन्यापेक्षा जास्त पाऊस वर्तविण्यात आला आहे व स्थिती पेरणी अनुकूल होईल असे सांगण्यात आले आहे.
3. ऑगस्ट महिन्यात पावसाची हजेरी ही संतोषजनक असेल व पिकांना बहरण्यात फार पोषक वातावरण निर्माण करताना दिसून येणार आहे.
4. सप्टेंबर महिन्यात वारावादळासह गार देखील पडेल व अवकाळी पाऊस होईल असे सांगण्यात आले आहे.
3) देशाच्या संदर्भात :-
1. पान-विडा कायम आहे म्हणजेच सुपारी विड्यावरच आहे ती हलली किंवा तिथे जाग्यावर नसली तर राजाला धोका असतो पण ती जाग्यावरच आहे त्यामुळे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच राहतील.
2. मसूरमध्ये काही बदल झालेला दिसून येत नाही त्यामुळे परराष्ट्र शत्रूंचा येत्या 1 वर्षात काही त्रास होणार नाही.
3. करडीमध्ये फारसा बदल नाही अनिश्चित आहे आणि संरक्षणाच्या दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारचा धोका उदभवणार नाही असे सांगण्यात आले आहे.
4) कुल दैवतेचा प्रकोप :-
अंबाडी हे कुलदैवत म्हणून संबोधित केल्या जाते त्यामुळे अंबाडी ठेवल्याप्रमाणेच आहे आणि म्हणून कुलदैवतेचा कसल्याही प्रकारचा प्रकोप होणार नाही.
आम्ही अपेक्षा करतो कि आपणास भेंडवळ घटमांडणीच्या संदर्भात भाकितांची माहिती मिळाली असेल व आपले समाधान झाले असेल. भेंडवळ घटमांडणी कशी केली जाते याची माहिती बऱ्याच लोकांना नाही. तिथपर्यंत कसे पोहोचावे याचीही माहिती फार कमी लोकांना आहे. त्याबाबत आम्ही खालील माहितीत संपूर्ण मांडणीबद्दल लिहिले आहे, ते वाच्याकरिता खाली क्लिक करा
ही माहिती त्या शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा ज्यांची यावर आस्था आहे आणि तुमच्या जिल्ह्याच्या ग्रुपला जुळण्यासाठी स्क्रीनवरील हिरवे बटन नक्की दाबा.