राज्यातील हवामान अंदाज पाहता ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस आणि सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनच पावसाने राज्याच्या बहुतांश भागात मोठी दडी मारली आहे. सध्याच्या ताज्या हवामान अंदाज नुसार, मुंबई, ठाणे आणि कोकण पट्ट्यात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला असून तिथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र, राज्याचा मुख्य कृषी पट्टा असलेला विदर्भ आणि मराठवाडा अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेतच होरपळत आहे. अशातच, हवामान विभागाच्या ताज्या रडार चित्रानुसार, थायलंड आणि पोर्ट ब्लेअरच्या जवळ एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, तो आता वेगाने भारताच्या दिशेने सरकत आहे.
हा निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा वायव्य दिशेने अतिशय वेगाने मार्गक्रमण करत आहे. हा पट्टा थेट विशाखापट्टणम मार्गे महाराष्ट्रात प्रवेश करणार असल्याने येत्या २० ते २५ सप्टेंबर दरम्यान विदर्भ आणि दक्षिण मराठवाड्याच्या अनेक सीमावर्ती भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, या प्रणालीमुळे खूप मोठा पाऊस न होता, सरासरी केवळ १५ ते २० मिलीमीटर पावसाची शक्यता आणि हवामान अंदाज तज्ज्ञांनी दिला आहे. पावसाचे प्रमाण इतके कमी असल्याने मराठवाडा आणि विदर्भातील वाळत चाललेल्या पिकांना याचा किती आणि कसा फायदा होईल, यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
“सध्या मुंबई, पुणे आणि कोकणात पाऊस पडत असला तरी, विदर्भ आणि मराठवाड्याला केवळ मान्सूनच्या या शेवटच्या टप्प्यावरील पावसावर अवलंबून राहावे लागत आहे. अंदमान समुद्रातून येणारा हा पट्टा विशाखापट्टणमवरून महाराष्ट्रात प्रवेश करताना केवळ १५ ते २० मिलीमीटर पाऊस देऊ शकतो. मान्सूनचा हंगाम आता संपत आल्याने आणि पावसाचे प्रमाण नगण्य असल्याने, आगामी काळात भीषण दुष्काळसदृश परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते.”
— हवामान अभ्यासक
हवामान अंदाज आणि प्रणालीचा प्रवास
हवामान अभ्यासकांच्या मते, अंदमान आणि पोर्ट ब्लेअरच्या जवळ तयार झालेला हा पट्टा बंगालच्या उपसागरातून सर्वात आधी आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम किनारपट्टीवर धडकणार आहे. विशाखापट्टणमहून पुढे सरकत असताना हा कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भातून राज्यात प्रवेश करेल. त्यानंतर तो मराठवाडा व पश्चिम विदर्भाच्या सीमेवरून मार्गक्रमण करेल आणि शेवटी मध्य प्रदेश व राजस्थानाकडे आपला मोर्चा वळवेल. साधारणपणे ३० सप्टेंबरपर्यंत ही प्रणाली देशाच्या मध्य आणि वायव्य भागात सक्रिय राहील.
या संपूर्ण प्रवासात जिथून हा पट्टा जाईल, तिथे अगदी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विशाखापट्टणमवरून राज्यात प्रवेश करताना चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये २० तारखेपासूनच हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. पुढे पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ आणि बुलढाणा या पट्ट्यात सलग दोन दिवस पावसाची शक्यता आहे. तसेच, जेव्हा हा पट्टा पुढे जाईल, तेव्हा दक्षिण मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड आणि जालना जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात केवळ रिमझिम पावसाच्या सरी कोसळतील. उत्तर महाराष्ट्रात जळगाव आणि धुळ्याच्या काही भागातही हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) कडून अधिकृत सूचना मिळण्याची प्रतीक्षा आहे.
दुष्काळाच्या झळा आणि रब्बी हंगामावर संकट
सध्या राज्यातील खरीप पिकांची स्थिती अतिशय चिंताजनक बनली आहे. पावसाने दिलेल्या मोठ्या ओढीमुळे खरीप हंगामातील पिकांचा अक्षरशः धिंगाणा उडाला आहे. पावसाअभावी निर्माण झालेल्या या गंभीर परिस्थितीची दखल घेत नुकतेच “जिथे पाऊस नाही तिथे पीक सर्वेक्षण करा”; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत. कारण, राज्यातील प्रमुख पीक असलेले सोयाबीन सध्या शेंगा भरण्याच्या आणि फुलोऱ्याच्या अत्यंत नाजूक अवस्थेत असून पाण्याच्या प्रचंड ताणामुळे झाडे पिवळी पडून कोमेजू लागली आहेत. कपाशीचीही उन्हाच्या तीव्र चटक्यांमुळे मोठ्या प्रमाणावर पातेगळ सुरू झाली असून बोंडे पोसण्यासाठी जमिनीत ओलावा उरलेला नाही.
सध्या मान्सूनचा हंगाम संपत आला असून, या १५ ते २० मिलीमीटर पावसाचा रब्बी हंगामाला (हरभरा, गहू) काहीही मोठा फायदा होणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. पावसाच्या या मोठ्या खंडाने राज्यात पुन्हा एकदा भीषण दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण केली आहे. जमिनीतील भूजल पातळी खालावली असून नद्या, नाले आणि धरणांमध्ये पाण्याचा ठणठणाट पाहायला मिळत आहे. आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत.
पावसाचे हे लहरी चक्र आणि कमी होत जाणारे प्रमाण यामागे बेसुमार झालेली ‘वृक्षतोड’ हे एक मोठे कारण आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळे पावसाचे पूर्ण चक्रच विस्कळीत झाले आहे. त्यामुळे, आता प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःच्या शेताच्या बांधावर किंवा पडीक जागेत झाडे लावणे अत्यंत काळाची गरज बनली आहे. जर आपण आता झाडे लावली नाहीत आणि निसर्गाचा समतोल राखला नाही, तर भविष्यात नदी-नालेच काय, पण जमिनीत पाण्याचा एक थेंबही शिल्लक राहणार नाही. शेतकऱ्यांनी निसर्गाच्या या बदलत्या चक्राची गांभीर्याने नोंद घेऊन आपल्या शेतात किमान १०-१५ झाडे तरी नक्की लावावीत, हेच या संकटावरील शाश्वत उत्तर ठरू शकते. अचूक हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी नेहमी अपडेटेड राहा.